कोल्हापूर : तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्या प्रथेनुसार मेहेकर (जि. बुलढाणा) येथील महेश पुरी कोल्हापुरात दाखल झाला. मात्र, तो पहिल्या लॉकडाऊनपासून कोल्हापुरातच अडकला. शेठ रुईया विद्यालयातील निवारा केंद्रात तो आश्रित म्हणून राहत आहे.
तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या मूळ गावी बुलढाणा येथे जायचे असा विचार करून महेश १२ मार्चला कोल्हापुरात दाखल झाला. देवीचे दर्शन आणि स्वत:वर किडनी स्टोनवरील उपचार घेऊन २३ मार्चला मूळ गावी परतण्याचा मानस व्यक्त करीत तो एका नातेवाइकाकडे राहिला. काही काळ दर्शन आणि उपचार घेतल्यानंतर २२ मार्चला सरकारने पहिला लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी त्याने बुलढाण्याला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक गाठले. मात्र, त्याला रात्री पुन्हा संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर झाल्याचे कळले. या दरम्यान आपण बुलढाण्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून तो पुन्हा नातेवाइकांकडे परतला.
या दरम्यान शेठ रुईया विद्यालयात त्याला निवारा केंद्र स्थापन झाल्याचे समजले. त्यानुसार तो स्वत: तेथे दाखल झाला. त्याची वैद्यकीय तपासणी झाली. पहिला लॉकडाऊन झाला आणि तत्काळ दुसरा लॉकडाऊन सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो बुलढाण्याला जायची वाट पाहत आहे. या काळात महापालिकेचे क्रीडानिरीक्षक सचिन पांडव यांनी केलेल्या मदतीचा तो आवर्जून उल्लेख करतो.एक गणिततज्ज्ञही येथेच अडकलायेथील एका बड्या खासगी क्लासमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून आलेले एक गणिततज्ज्ञही याच निवारा केंद्रात आश्रित म्हणून आहेत. त्यांनी तर एका ठिकाणी महिनाभर राहण्यासाठी खोलीही घेतली होती. मात्र, घरमालकाने कोरोनाचे कारण देत तेथून त्यांना चक्क हाकलून काढले. त्यामुळे त्यांना शेठ रुईया विद्यालयाचा आसरा घ्यावा लागला. येथील महापालिकेची मंडळी आपलेच नातेवाईक असल्यासारखे व्यवस्थापन करीत आहे, असा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला.
तिरूपती बालाजीला जाऊन अंबाबाई देवीचे दर्शन घ्यायचे, किडनी स्टोनवरील औषधोपचार घ्यायचे आणि पुन्हा मूळ गावी बुलढाण्याला परतायचे, असा विचार करून कोल्हापुरात आलो. मात्र, लॉकडाऊनमध्ये अडकलो. ही शिक्षा नसून मला आई अंबाबाईच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाल्याचे मी समजतो.- महेश पुरी, बुलढाणा