कोल्हापूर : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारा भामटा संतोष रंगराव पाटील (वय ३८, रा. पांगिरे, ता. भुदरगड) याच्याकडे कोल्हापूर अर्बन बँक आणि डी मार्टचे बनावट ओळखपत्र पोलिसांना तपासात मिळाले. त्याने बनावट नियुक्तीपत्रे तरुणांना दिल्याचे तपासात समोर आले आहे. आणखी एका तक्रारदाराने रविवारी भामटा पाटील याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.कोल्हापूर महानगरपालिकेसह कोल्हापूर अर्बन बँक आणि डी मार्टमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून भामटा संतोष पाटील याने तरुणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. त्यासाठी त्याने स्वत:ची अर्बन बँक आणि डी मार्टमध्ये अधिकारी पदावर कार्यरत असल्याची बनावट ओळखपत्रे तयार केली होती. ओळखपत्र दाखवून तो लोकांचा विश्वास संपादन करीत होता. २०१८ पासून त्याने अनेक लोकांची फसवणूक केली. कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याला आयती संधी मिळाली. नियुक्तीपत्रे दिली असली तरी कोरोना संसर्गाची स्थिती सुधारल्याशिवाय नोकरीत रुजू करून घेणार नाहीत, असे सांगून तो तरुणांना टाळत होता.कोल्हापूर अर्बन बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याने चौघांकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेतले. डी मार्टमध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन दोघांकडून सुमारे अडीच लाख रुपये घेतले. महापालिकेत नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन एका तरुणाकडून पावणेदोन लाख रुपये घेतले. रविवारी आणखी एका तक्रारदाराने पोलिसांना अर्ज दिला असून, त्याला डी मार्टमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यात आले होते, असे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनिषा फाळके यांनी सांगितले.साथीदार कोण?बनावट नियुक्तीपत्र तयार करणे, शिक्के तयार करणे, नोकरीच्या शोधात असलेल्या गरजूंचा शोध घेणे या कामात भामटा पाटील याला काही साथीदारांनी मदत केल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गावातून हाकललेभामटा संतोष पाटील याने त्याच्या पांगिरे गावातील काही तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यापूर्वीच त्याला गावातून हाकलले आहे. त्याच्यामुळे गावाची बदनामी होत असल्याचीही भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भामटा संतोष पाटील याने गेल्या पाच वर्षात अनेकांना गंडा घातल्याचे तपासात समोर येत आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह तक्रारी द्याव्यात. - मनिषा फाळके - सहायक पोलिस निरीक्षक