कोल्हापूर : फायनान्स कंपनीचे कर्ज भरण्याचे आमिष दाखवून अवघे ५५ हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन ट्रक घेऊन पसार होणाऱ्या भामट्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट नावाचा आधार घेत संचकारपत्र करून त्याने हे फसवणुकीचे कृत्य केले. अजिम सलीम पठाण (रा. रहिमतपूर, कोरेगाव, सातारा) असे त्या संशयिताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती, विजय हिंदुराव पाटील (रा. शहापूर, इचलकरंजी) यांनी २०१९ मध्ये जुना ट्रक खरेदी केला होता. त्यांनी तो शेजारील रोहित खटावकर यांना वापरण्यास दिला. ट्रकवर फायनान्स कंपनीकडून १२ लाख ५० हजारांचे कर्ज होते पण कर्ज परतफेडीत अडचणी आल्याने ट्रक विक्रीस काढला. खटावकर यांनी त्याची जाहिरात फेसबुकवर टाकली.जाहिरात वाचून मोबाईलवर समीर शेख नावाच्या व्यक्तीने खटावकरकडे ट्रकबाबत चौकशी केली. त्यानंतर दि. २ सप्टेंबरला मध्यवर्ती बसस्थानक येथे व्यवहार होऊन पाटील यांना ॲडव्हान्सपोटी ५५ हजार रुपये दिले. त्याचे संचकारपत्र (नोटरी) केले. त्याने ट्रक नेताना फायनान्स कंपनीचे कर्ज पुढील १५ दिवसांत फेडण्याचे आश्वासन दिले.
पुढे पंधरा दिवसांनंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून पाटील यांना टोलविले. त्यानंतर त्याचा फोन बंद झाल्याने पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी नोटरीवरील पत्ता घेऊन ते करंडी (मेढा ता. जावळी जि. सातारा) येथे गेले, पण तेथे समीर शेख नावाची व्यक्तीच नसल्याचे आढळले.
पोलीस ठाण्यातून त्याचे खरे नाव अजीम सलीम पठाण (रा. रहिमतपूर, ता, कोरेगाव, जि. सातारा) असे असल्याचे समजले. त्यामुळे पाटील यांनी फसवणुकीबाबत संशयित पठाण याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.सातारा पोलिसांतही ठकसेनाबाबत तक्रारसंबंधित ठकसेनाने आणखी एकाच्या ट्रकचा अपहार केल्याची बातमी सातारा येथील एका वृत्तपत्रात दि. १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली. त्यावरून पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे गाजले, तेथे तोच ठकसेन असल्याचे फोटोत ओळखले तेथेच त्याचे खरे नाव पाटील यांना समजले.