कोल्हापूर : कुत्रे सतत भुंकत असल्याचा आणि आपल्या रिकाम्या जागेत फिरत असल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने कुत्र्याला छऱ्याच्या बंदुकीने गोळ्या घालून ठार मारले. बोंद्रेनगर रिंगरोड परिसरात गगनगिरी पार्क येथे बुधवारी (दि. १६) सायंकाळी ही घटना घडली. मृत कुत्र्याची गुरुवारी (दि. १७) मंगळवार पेठेतील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उत्तरीय तपासणी करण्यात आली. कुत्र्याच्या छातीत छरे लागल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू सोनबा बोडके (वय ३२, रा. लक्षतीर्थ वसाहत, सासने कॉलनी, कोल्हापूर) यांचा बोंद्रेनगर रिंगरोड परिसरातील पाडळी रोडवर गगनगिरी पार्क येथे जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यावर त्यांचा पाळीव कुत्रा होता. कुत्रा सतत भुंकत असल्याचा आणि आपल्या रिकाम्या जागेत फिरत असल्याच्या रागातून याच परिसरातील विनायक पाटणकर यांनी कुत्र्याला छऱ्याच्या बंदुकीतून गोळ्या घातल्या होत्या. बुधवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर कुत्र्याचे मालक राजू बोडके यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
बोडके यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी दुपारी मंगळवार पेठेतील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत कुत्र्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान कुत्र्याच्या शरीरात छरे लागून जखमा झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती बोडके यांनी दिली. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर संशयित विनायक पाटणकर यांची चौकशी केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी सहायक फौजदार संजय कांबळे यांनी दिली.