कोल्हापूर : गोखले कॉलेज चौकात असहाय अवस्थेत मिळून आलेल्या एका अनोळखी आजारी वृध्दास काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही दाखल करून न घेतल्याने त्यांना महापालिकेतील आरोग्याधिकारी यांच्या कक्षात नेऊन बसविण्यात आले. तेथून मग सूत्रे हलली आणि रुग्णवाहिकेतून त्या वृध्दास आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
शहरातील गोखले कॉलेज चौकात बराच वेळ एक वृध्द व्यक्ती असहाय अवस्थेत बसून होती. ती व्यक्ती आजारीही होती. दुपारी जनसंघर्ष सेनेचे शुभम शिरहट्टी व त्यांच्या मित्रांनी वृध्दाची चौकशी केली. परंतु त्यांना नीट काही माहिती देता येत नव्हती. त्यांनी नाव काय असे विचारले असता भरतकुमार बुढ्ढे असे सांगितले. परंतु हेच नाव असेल याची त्यांना खात्री पटली नाही.
शेवटी त्यांची अवस्था बघून कार्यकर्त्यांनी त्या वृध्दास सावित्रीबाई फुले रुग्णालय, सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यास रिक्षातून नेले. परंतु तेथे त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. कोविड चाचणी झाल्याखेरीज दाखल करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी करण्याकरिता दोन ठिकाणी नेण्यात आले, पण तेथील केंद्र बंद झाली होती.
आता करायचे काय या विचारात असलेल्या शुभम यांने त्या वृध्दास रिक्षातून महापालिका चौकात आणले. तेथे कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याना आरोग्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन खुर्चीवर बसविले. ही माहिती कळताच अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे तेथे आले. त्यांनी तत्काळ त्या वृध्दास रुग्णवाहिकेतून आयसोलेशन हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले.
फोटो क्रमांक - १९०७२०२१-कोल-केएमसी०२
ओळ - कोल्हापूर शहरातील गोखले कॉलेज चौकात मिळून आलेल्या अनोळखी आजारी वृध्दास रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे चक्क महापालिकेतील आरोग्याधिकाऱ्यांच्या कक्षात आणून बसविण्यात आले.