लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील विविध रुग्णालयांत आज, शुक्रवारपासून अचानक भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यामध्ये लागू केलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालयात महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाची दुसरी लाट आली असून, यामध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवस कडक निर्बंध जारी केले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बैठक पार पडली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
बैठकीस तहसीलदार प्रदीप उबाळे, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, उपमुख्याधिकारी केतन गुजर आदींसह अधिकारी उपस्थित होते.