कोल्हापूर : शिवाजी पुलाजवळील हौद उतरण्याचे काम आज, शनिवारपासून सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय कृती समितीला दिले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्यामुळे कोल्हापुरातील कृती समितीच्या आंदोलकांनी हौद पाडला खरा परंतु तो पाडण्याची आवश्यकताच नव्हती, अशी माहिती शुक्रवारी चर्चेतून पुढे आली तरीही कृती समितीने हौद पाडण्याचे पाप बांधकाम विभागाच्या डोकीवरच फोडण्यात आले. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गाला जोडणाऱ्या शिवाजी पुलाचे आयुष्य संपल्यामुळे त्याच्या शेजारीच पर्यायी पुलाचे बांधकाम सुरू आहे; परंतु पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन करून या बांधकामाच्या आड येणारा जकात नाका, पाण्याचा हौद तसेच आठ ते दहा झाडे तोडण्यासाठी आंदोलन केले. तथापि सुरुवातीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आंदोलकांची दिशाभूल केल्याने आंदोलकांनी जकात नाका व पाण्याचा हौद पाडला. आता पाडण्यात आलेला हौद अन्यत्र स्थलांतर करावा म्हणून त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांना वेठीस धरले होते. त्यामुळे शुक्रवारी शिवाजी पुलावर प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले होते. त्यानुसार बांधकाम विभागाचे अधिकारी अभय आवटी, मनपाचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचना सहायक संचालक धनंजय खोत, शहर हेरिटेज कमिटीच्या अमरजा निंबाळकर, कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पाडलेला हौद अन्यत्र स्थलांतर करून तो नव्याने बांधावा, असा आग्रह धरला. गेल्या काही महिन्यांपासून पाण्याचा हौद बांधकामाच्या आड येत असल्याचे सांगणारे बांधकाम विभागाचे आवटी शुक्रवारी मात्र हौद पाडण्याची आवश्यकता नाही, तो पुलाच्या आडवा येत नाही तर थोडा भाग जोड रस्त्यात येतो, असे सांगायला लागले. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. तुम्ही सांगत होता म्हणूनच आम्ही आंदोलन केले आहे, आता पाडण्यात आलेला हौद अन्यत्र हलवून त्याचे बांधकाम करावे, काम कधी सुरू करणार हे स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला येथून सोडणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. दीपा पाटील, रूपाली पाटील, जहिदा मुजावर, सुनीता राऊत, पल्लवी ढगे, शीतल तिवडे, माई वाडेकर, मंजिरी वालावलकर, पूनम सुळगांवकर यांनी अभय आवटी यांना चक्क घेरावो घातला. त्यामुळे अडचणीत आलेल्या आवटी यांनी नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला.
‘तो’ वादग्रस्त हौद आज हलविणार
By admin | Published: April 30, 2016 12:26 AM