आजरा : शिरसंगी (ता. आजरा) येथे शॉर्टसर्किटने उसाच्या फडाला लागलेल्या आगीत ५० एकरांमधील ऊस जळाला. आगीत ३५ ते ४० शेतकऱ्यांचे उसाबरोबर पाईपलाईन, शेती अवजारेही जळाली. म्हारकी नावाच्या शेतात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीत अंदाजे २० लाखांवर नुकसान झाले आहे. म्हारकी नावाच्या शेतात नागोजी आप्पा कांबळे यांच्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटने आग लागली. अर्ध्या तासात आगीने चोहोबाजूने वेढले. त्यामध्ये वारे असल्याने आग वाढतच गेली. आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. जवळपास तीन तास आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. आगीत दत्तात्रय विठोबा यलगार यांची पाईपलाईन, मोटर व शेती अजवारे, तर रामू कांबळे, गणपती कांबळे यांचे ऊस व पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. आगीत मारुती दळवी, ज्ञानेश्वर दळवी, चाळू दळवी, यशवंत कांबळे, तुळसाबाई कांबळे, रामू कांबळे, शामराव कांबळे, संभाजी गुडूळकर, महादेव कांबळे, दादू कांबळे, पांडुरंग कांबळे, भागोजी कांबळे, कृष्णा कांबळे, भिकाजी कांबळे, युवराज कांबळे, संजय कांबळे, वत्सला कांबळे, काळोजी कांबळे, थळबा कांबळे, विष्णू कांबळे, नारायण कांबळे, परशराम कांबळे, शामराम कांबळे, शिवराम कांबळे, मारुती कांबळे, पिराजी कांबळे, गंगाराम कांबळे, गणपती कांबळे, दत्तात्रय यलगार यांचे ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. जळालेल्या क्षेत्राचे मंडल अधिकारी प्रकाश जोशिलकर, तलाठी प्रवीण परीट, कृषी सहायक विकास जोशिलकर, ग्रामसेवक राहुल सुतार, सरपंच संदीप चौगुले यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. वीज वितरणचे अधिकारी संदीप गायकवाड यांनी जळालेल्या क्षेत्राला भेट दिली.
---------------------
* फोटो ओळी : शिरसंगी (ता. आजरा) येथील म्हारकी नावाच्या शेतात उसाच्या फडाला लागलेली आग. क्रमांक : १००२२०२१-गड-०४