लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या, रविवारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र बँकांचे मुख्य कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण काेरे यांनी पत्रकातून दिली.
जिल्हा प्रशासनाने आज रात्री १२ ते २३ मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे सोमवार (दि. १७)पासून बँकांचे सर्व कामकाज बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. याबाबत नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांची भेट घेऊन अडचणी सांगितल्या. बँकांचे क्लिअरिंग व्यवहारांची अडचण येणार असल्याने मुख्य कार्यालये सुरू ठेवावीत, अशी मागणी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून सहकारी बँकांचे डेटा सेंटर, चेक क्लिअरिंग व एटीएम कॅश मॅनेजमेंट या गोष्टी चालू राहण्यासाठी मुख्य कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.