कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम.च्या सत्र एक व सहाच्या परीक्षांना सोमवारपासून प्रारंभ झाला. आॅनलाईन अर्ज नीट भरला गेला नसल्याने ‘आॅडनंबर’ (ऐनवेळी दिलेला नंबर)ची डोकेदुखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कायम राहिली.बी.ए., बी.कॉम., आदी विद्याशाखांच्या द्वितीय सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने गेल्या दीड महिन्यापूर्वी जाहीर केले होते; पण पहिल्या सत्रातील विविध विद्याशाखांच्या सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज व्यवस्थितपणे भरले नसल्याने त्यांच्या निकालाची प्रक्रिया लांबली. यातील अधिकतर विद्यार्थ्यांना ते उत्तीर्ण, अनुत्तीर्ण आहेत का हे समजण्यापूर्वीच द्वितीय सत्रासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील मार्च, एप्रिल-२०१५ मधील बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमाच्या सत्र एक व सहाच्या उन्हाळी परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्याअंतर्गत नियमित व दूरशिक्षण विभागाचे सुमारे ५० हजार विद्यार्थी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील परीक्षेला बसले आहेत. द्वितीय सत्रातील परीक्षांच्या पहिल्या दिवशीच आॅडनंबरची डोकेदुखी परीक्षा यंत्रणेला सुरू झाली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी साधारणत: पाच ते दहा टक्के विद्यार्थ्यांना ‘आॅडनंबर’ देऊन परीक्षेला बसवावे लागल्याचे प्राचार्य आणि परीक्षेसंबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. साताऱ्यातील काही विद्यार्थ्यांना पेपर देऊन त्यांना ‘आॅडनंबर’ मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागल्याचे समजते.दरम्यान, विद्यापीठाकडून सर्व परीक्षा केंद्रांकरिता अभिनव पद्धतीने व गोपनीयता पाळून परीक्षा केंद्रनिहाय प्रश्नपत्रिकेचे गठ्ठे उपलब्ध करून दिले आहेत. आॅक्टोबर २०१४ च्या परीक्षेमधील काही रिपीटर विद्यार्थ्यांच्या निकालामधील त्रुटीबाबत परीक्षा विभागाकडून योग्य ते नियोजन झाले असून, संबंधित विद्यार्थ्यांना स्वतंत्र आसन क्रमांक दिले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना केलेल्या चुकांमुळे असे आसन क्रमांक द्यावे लागले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून परीक्षा विभागाकडून या स्वरूपातील स्वतंत्र आसन क्रमांकाची व्यवस्था केली आहे. मात्र, या क्रमांकाचे विद्यार्थी वाढल्यास त्याचा फटका निकाल वेळेवर लागण्याच्या प्रक्रियेला बसण्याची शक्यता परीक्षेच्या कामकाजातील कर्मचाऱ्यांनी, प्राचार्यांनी व्यक्त केली. आसन क्रमांकाची उपलब्धतारिपीटर विद्यार्थ्यांना त्यांच्या राहिलेल्या विषयांच्या पुनर्परीक्षेकरिता बी.ए.साठी २०० आणि बी.कॉम.च्या परीक्षेसाठी ३५० स्वतंत्र आसन क्रमांक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधीच्या परीक्षांमधून राहिलेल्या विषयांच्या पुनर्परीक्षेकरिता संबंधित महाविद्यालयामध्ये तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा नियंत्रक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
‘आॅडनंबर’ची डोकेदुखी कायम
By admin | Published: March 31, 2015 12:10 AM