संदीप खवळे- कोल्हापूरसोमवारी दुपारी अडीचची वेळ. स्थळ डाएट् कॉलेज. नेहमीचीच वर्दळ. हेडफोन कानात घातलेला मोटारसायकलस्वार पाच बंगल्याच्या दिशेने जात असतो. त्याचवेळी त्याच दिशेने एक भरधाव कार मागून येते. संगीत ऐकण्यामध्ये तल्लीन झालेला हा तरुण डाएट् कॉलेजच्या चौकात इंडिकेटर न दाखविताच उजवीकडे वळतो. कारचालकालाही त्याच बाजूला जायचे असते; पण कारचालकाच्या प्रसंगावधनामुळे थोडक्यात अपघात टळतो. हेडफोनच्या नादात सांगली येथे रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडेल्या नीता गायकवाड या डॉक्टर तरुणीला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत ‘संगीताची धुंदी, अपघाताला संधी’ असे चित्र दिसून आले. रिक्षावाल्यापासून मोलकरणीपर्यंत आणि ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत हेडफोनच्या आहारी गेलेले असंख्यजण आपल्या अवती - भोवती आहेत. प्रवास असो की मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक असो किंवा के.एम.टी.मधील प्रवास अशा सर्वच ठिकाणी हेडफोन कानात टाकून संगीतविश्वामध्ये मग्न झालेली माणसे हमखास आढळतात. रस्ता, रेल्वे स्थानकातील क्रॉसिंग, के.एम.टी. बस, बसस्थानके या ठिकाणी हेडफोन कानात अडकून आपल्या तंद्रीत रममाण झालेले असंख्य नागरिक एका नव्या अपघाताच्या उंबरठ्यावर असतात. सिग्नल सुरू असतानाही हेडफोनचा वापर करणारे महाभाग पदोपदी आहेत. गाणे ऐकण्यात युवावर्ग तर इतका तल्लीन असतो की, बसमध्ये तिकीट काढतानाही कानातून हेडफोन काढण्याचे कष्ट घेत नाहीत, परिणामी बस कंडक्टरशी हुज्जत झाल्याची उदाहरणे आहेत. लांबच्या प्रवासासाठी निघालेले ड्रायव्हर, रिक्षावाले तर हेडफोन घेऊनच बाहेर पडतात. त्यामुळे त्यांचे वाहनावर पूर्णपणे नियंत्रण नसते.गाण्यांमध्ये तल्लीन असलेल्या अनेक वाहधारकांचे विशेषत: युवावर्गाचे सिग्नलकडे लक्ष नसते. गाणी ऐकण्याच्या नादात सिग्नल सुरू असताना थांबलेल्या वाहनाला पाठीमागून धडकण्याच्या अनेक घटना घडतात. - सागर कुंभार, माजी वाहतूक पोलीस साईड इफेक्टकडेही लक्ष द्यासाधारणत: मनुष्य जास्तीत जास्त ६० डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकतो. यापुढील तीव्रतेचा आवाज धोकादायक असतो. साठ डेसिबलपेक्षा कमी आवाज सलगपणे आपण जास्तीत जास्त ६० मिनिटेच ऐकला पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ आवाज सातत्याने ऐकल्यास कायमस्वरूपी कमी ऐकू येणे, कान दुखणे, अशा समस्या उद्भवतात. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे हेडफोनच्या माध्यमाूतन युवक - युवती कित्येक तास संगीत ऐकतात. संगीत ऐकताना निर्माण झालेल्या तल्लिनता आणि हेडफोनमुळे कानच बंदिस्त झाल्यामुळे आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही हे कानाच्या दृष्टीने घातक आहे. प्रवासादरम्यान अशीच स्थिती राहिल्यास अपघाताचा धोका असतो, पण दुर्दैवाने आजही याबाबत नागरिकांमध्ये भान नाही. सतत संगीत ऐकल्यास केशपेशींची झीज होऊन अंतर्कर्णाच्या अनेक समस्या निर्माण होतात, असे वाच्या व श्रवणतज्ज्ञ शिल्पा हुजूरबाजार यांनी हेडफोनच्या दृष्परिणामाविषयी बोलताना सांगितले.
‘हेडफोन’ ठरतोय डेथझोन
By admin | Published: August 12, 2015 12:31 AM