कोपार्डे : ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा जलद व प्रभावीपणे मिळणे आवश्यक झाले आहे. विकासाबरोबर आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून, करवीर विधानसभा मतदारसंघात दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. जलद आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण भागाला या रुग्णवाहिकेने हातभार लागेल, असा आशावाद आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.
खुपिरे (ता. करवीर) येथे ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून खुपिरे ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रूपाली जांभळे होत्या.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, खुपिरेसह करवीर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाबरोबरच कोरोना काळात जनतेला जलद आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मतदारसंघात दोन ठिकाणी रुग्णवाहिका दिल्या आहेत. कोराेनाचे रुग्ण वाढत आहेत. सर्वांनी स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी, सरकार जनतेच्या पाठीशी आहे.
यावेळी करवीर पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील यांचे मनोगत झाले. कुंभी कारखाना माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सरदार बंगे व माजी सरपंच प्रकाश चौगले, जिल्हा शल्यचिकित्सक ए. डी. माळी, वैद्यकीय अधीक्षक एस. बी. थोरात, दादा बँक संचालक कृष्णात कुंभार, सरपंच रूपाली जांभळे, उपसरपंच तानाजी पाटील, हिंदुराव पाटील, सनी पाटील, रणजित पाटील, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील, तानाजी गवळी, हिंदुराव माळवले, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका प्रदान करताना आमदार पी. एन. पाटील. यावेळी तुकाराम पाटील, सरदार बंगे, प्रकाश चौगले व ग्रामस्थ उपस्थित होते.