कोल्हापूर : मोरे-मानेनगर येथे नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपनगरातील गरजूंना निश्चित लाभ होईल, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी येथे केले.उपनगरातील मोरे-मानेनगर येथे महानगरपालिकेने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ११चे लोकार्पण शनिवारी आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी होते. याप्रसंगी प्रतिमा सतेज पाटील, विरेंद्र मंडलिक हेही उपस्थित होते.तुळजाभवानी प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या प्रयत्नातून या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी झाली आहे. या केंद्राच्या उभारणीस ३५ लाख रुपये खर्च आला असून, त्यामध्ये इमारत, फर्निचर, कंपौड वॉल, टॉयलेट अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. नगरसेवक दिंडोर्ले यांच्या कामाचे कौतुक करतानाच येथून पुढच्या काळात आम्ही पाटील कुटुंबीय त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही देखील आमदार पाटील यांनी दिली.आरोग्य केंद्राच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण आयुक्त कलशेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपमहापौर संजय मोहिते, डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, विशाल दिंडोर्ले, दिलीपराव सासने उपस्थित होते. स्वागत बरगे यांनी केले, तर राजू दिंडोर्ले यांनी आभार मानले.