कोल्हापूर : संत भगवान बाबा (भगवानगड) यांची ५५ व्या वामनभाऊ महाराज (गहिनीनाथगड) ४४ आणि खंडोजी बाबा यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्त छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वाहनतळावर ऊस तोडणी कामगारांसह इतरांचीही आरोग्य शिबिरात मोफत तपासणी करण्यात आली.प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिमापूजन, पालखीपूजन करून कसबा बावडा हनुमान मंदिरापर्यंत पालखी सोहळा झाला. दिवसभर ‘तात्याबा सामाजिक प्रतिष्ठान’तर्फे ‘महाआरोग्य शिबिर’ घेण्यात आले.
ऊसतोडणी मजुरांसाठी मोफत कान, नाक, घसा, हृदयरोग, पोटविकार, कंबर, मान, पाठदुखी, रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग अशा आजारांचे निदान व त्यावरील मोफत उपचारही करण्यात आले. शिबिराचा ३९५ जणांनी लाभ घेतला. १८७ रुग्णांची नेत्र तपासणी केली.
मोफत शस्त्रक्रियेसाठी २७ जणांची सोय करण्यात आली. लायन्स नॅबचे संचालक नंदकुमार सुतार, मेडिकल असोसिएशन, महाडिक उद्योग समूहाची मदत मिळाली. नगरसेवक अशोक जाधव, सुभाष बुचडे, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. भारत खराटे, संजय नांद्रेकर, ‘तात्याबा सामाजिक प्रतिष्ठान’चे अध्यक्ष बाबासाहेब बांगर, ग्रामपंचायत सदस्य अशोक बांगर, आदी उपस्थित होते.उपक्रमासाठी पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष उद्धव ढाकणे, सचिव भागवत बांगर, उपाध्यक्ष सुरेश पाखरे, मार्गदर्शक अंबादास बडे, संजय कराड, कार्यवाह किशनदेव महादेव बडे, अशोक ढाकणे, संतोष राख, विष्णू बुधवंत, आदींनी परिश्रम घेतले.