कोल्हापूर: केंद्र तसेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. यानुसार प्रत्येक तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर लसीकरणाची तयारी करण्याच्या सूचना प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच सर्व पंचायत समिती यांना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात अद्याप १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केलेले नाही. या अनुषंगाने केंद्र सरकारने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला लसीकरण सुरू करण्याबाबत सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हे लसीकरण होणार असून, याची नोंदणी ऑनलाइन करणे आवश्यक आहे. तसेच दरदिवशी प्रति केंद्रावर २०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे लसीकरण ९ ते ५ या वेळेत होणार आहे. ही मोहीम कधी सुरू होणार याबाबत लवकरच कळविले जाणार आहे.
जिल्ह्यातील लसीकरणासाठी निवडण्यात आलेली केंद्रे पुढीलप्रमाणे:
- ग्रामीण रुग्णालय: आजरा, भुदरगड, चंदगड, नेसरी, हातकणंगले, कागल, मुरगूड, खुपीरे, शिरोळ.
- उपजिल्हा रुग्णालय: गडहिंग्लज, कोडोली, गांधीनगर.
- प्राथमिक आरोग्य केंद्र: निवडे, कळे, तारळे, वाळवा, जयसिंगपूर.