गडहिंग्लज : डोंगराळ व दुर्गम चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्यातील रिक्त पदे त्वरीत भरण्यास आरोग्य विभागातील महत्वाच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी यासाठी आमदार राजेश पाटील यांनी आरोग्यमंत्रीराजेश टोपे व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदनाद्वारे साकडे घातले.मुंबई येथे मंत्री टोपे व यड्रावकर यांची आमदार पाटील यांनी समक्ष भेट घेतली आणि गडहिंग्लज विभागातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विविध प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासंबंधी चर्चा केली.
सर्व रूग्णालयांमध्ये एक्स-रे, डायलेसीस, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय आणि सर्प व श्वानदंशावरील लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.श्रेणीवर्धन करून गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात अतिरिक्त १०० खाटांची सुविधा करा, आजरा ग्रामीण रूग्णालयात ३० ऐवजी ५० खाटांची सुविधा करा आणि पाटणे फाटा येथील नियोजित ट्रामा केअर सेंटरला हलकर्णी औद्योगिक वसाहतीमधील जागा खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.चंदगड ग्रामीण रूग्णालयातील रिक्त १३ पदे तातडीने भरावेत, राजगोळी खुर्द येथे २ कोटी ७३ लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी पदनिर्मिती करून ते केंद्र तातडीने जनतेसाठी खुले करावे, अशीही मागणी त्यांनी केली.