कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असल्याची चर्चा चार जिल्ह्यातील आरोग्य विभागात रंगली होती. त्याचे वृत्त लोकमतमध्ये २२ सप्टेंबर २०२१ प्रसिद्ध होऊनही अद्याप या साखळीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.या प्रकरणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही चौकशीचे आदेश देण्याचे विसरले.
या कार्यालय अंतर्गत चार जिल्हे येत असून यात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यात पदानुसार देवघेव झाली होती. या देवघेवीची दखल आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी देखील घेतली होती. मात्र अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याने कार्यालयातील टोळीने आमचे कोणी काही करु शकत नाही अशी भीती चार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या मनात या साखळीने घातली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री महोदय यांच्यापर्यंत वृत्त पोहोचताच त्याची गंभीर दखल घेऊन आरोग्य मंत्री टोपे यांनी आरोग्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या साखळीची चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या चौकशीचे काय झाले हे अद्याप समजले नाही. शिवाय ही साखळी पुन्हा नव्याने देवघेवीच्या कामाला लागली आहे.
बदली फक्त कागदावरच....
- या साखळीतील एका कर्मचाऱ्याची पदोन्नतीवर सीपीआर रुग्णालय येथे बदली करण्यात आली. मात्र अन्य कर्मचाऱ्यांनी अशी बदली मागितल्यास त्याला मुख्यालय ठिकाणी बदली देता येत नसल्याचे सांगितले जाते. हा कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जवळचा असल्याने तो सीपीआर मध्ये फक्त एक दिवस हजर झाला.- पाच महिन्यांपासून या साखळीतील कर्मचारी हा बदली सीपीआरला काम मात्र आरोग्य उपसंचालक कार्यालयात करत आहे. तशीच स्थिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांची आहे. त्याची बदली उपसंचालक कार्यालयात झाली आहे तरी तो सीपीआर मध्येच काम करत आहे. हे दोन्ही कर्मचारी साहेबांच्यासाठीच वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत.