कोल्हापूर : महानगरपालिकेकडे ठोक मानधनावर सेवेत असलेल्या डॉ. दिलीप पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शुुक्रवारी प्रशासनाच्या पातळीवर झाला; परंतु त्यांनी पुन्हा कामावर येण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी आरोग्य विभागावरील चर्चेत नगरसेवक भूपाल शेटे यांनी आरोग्य विभागावर हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता; तसेच ‘तुम्हाला काम जमत नसेल तर घरी जावा; आम्ही नियोजन करतो,’ अशा शब्दांत डॉ. दिलीप पाटील यांचा अवमान केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. पाटील यांनी पदभार सोडत असल्याचे सांगून तत्काळ सभागृहातून काढता पाय घेतला होता. सभागृहातून बाहेर पडलेले डॉ. पाटील आपल्या कार्यालयात न जाता, तसेच महापालिकेचे वाहन घेऊन न जाता रिक्षाने घरी गेले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईलसुद्धा स्विच आॅफ लागत आहे. गुरुवारी महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे डॉ. दिलीप पाटील यांच्या घरी गेले होते. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राजीनामा देण्याचा विचार करू नका, अशी विनंतीही ढेरे यांनी त्यांना केली; परंतु डॉ. पाटील यांनी आता परत महापालिकेच्या सेवेत येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्याधिकारीपदाचा कार्यभार तात्पुरता अन्य कोणातरी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा विचार प्रशासन करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेस स्वतंत्र असा आरोग्याधिकारी मिळालेला नाही. बऱ्याच वेळा प्रभारी कार्यभार दिला जातो. पर्याय म्हणून ठोक मानधनावर डॉ. पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
आरोग्याधिकारी राजीनाम्यावर ठाम
By admin | Published: December 19, 2015 1:07 AM