उदगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिरोळ तालुक्यातील चिंचवाड व संभाजीपूर या दोन गावांसाठी आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सध्या या दोन गावांचे कामकाज सुरु आहे. परंतु, नवीन उपकेंद्र मंजूर झाल्याने जयसिंगपूर केंद्रावरील ताण कमी होणार आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उदगाव अ व ब, चिपरी ही उपकेंद्र आहेत. जयसिंगपूर शहर, उदगाव, चिंचवाड, चिपरी, कोंडीग्रे, संभाजीपूर या लोकसंख्येचा भारही या केंद्रावर आहे. परंतु, वाढती लोकसंख्या व आजार लक्षात घेता ही यंत्रणा तोकडी पडत आहे. याचा विचार करुन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती स्वाती सासणे व डॉ. पांडुरंग खटावकर यांनी चिंचवाड व संभाजीपूर येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
---------------
कोट - उदगाव जिल्हा परिषद मतदार संघातील संभाजीपूर व चिंचवाड येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी मागणी गेली कित्येक वर्षे होत होती. परंतु, आता त्याला मूर्त स्वरुप आले आहे. लवकरच या उपकेंद्रांत प्रत्यक्ष कामकाज सुरु होईल.
- स्वाती सासणे, जिल्हा परिषद सदस्य