कोल्हापूर : जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी ‘अॅप’ तयार झाल्यावर, तसेच औषधांसाठी निधी व साधनांची उपलब्धता झाल्यानंतरच मुहूर्त लागणार आहे. सर्वेक्षणासंदर्भात ‘आयुष’ समितीकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय व आयुष समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ११ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे निर्देश दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. हे सर्वेक्षण आशा वर्कर्सच्या माध्यमातून मोबाईलवर आधारित ‘आयुष’ या अॅपद्वारे करण्यात येणार होते; परंतु अद्याप हे अॅप विकसित करण्याचे काम सुरू आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी येणारा खर्च, तसेच ज्येष्ठांसाठी लागणा-या औषधांसाठी येणारा खर्च या संदर्भात वर्कआऊट सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ‘आशा वर्कर्स’ना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
या संदर्भात आयुष समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश साळे यांनी आढावा घेऊन कृती आराखडा तयार केला आहे. लवकरच हा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींचे आरोग्य प्रबोधन केले जाणार आहे. यामध्ये त्यांनी काय व्यायाम करायचा, कोणता आहार घ्यायचा यांसह धूम्रपान करू नये, अशी माहितीपर पत्रके वाटली जाणार आहेत.
जिल्ह्यातील ५० वर्षांपुुढील ज्येष्ठ व व्याधिग्रस्त व्यक्तींच्या सर्वेक्षणासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत आढावा बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ‘अॅप’ विकसित झाल्यानंतर या सर्वेक्षणाला सुरुवात केली जाईल.- डॉ. योगेश साळे, अध्यक्ष, आयुष समिती