करंजफेण प्रतिनिधी : पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील स्वरूपा विजय शिदें (वय ३०)या प्राथमिक आरोग्य केंद्र करंजफेण ता.शाहुवाडी अंतर्गत येणाऱ्या नांदगाव आरोग्य उपकेंद्रात कामाला होत्या, आज सकाळी १० च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र करंजफेण येथे सावर्डी येथील सोनाली सुरेश कांबळे हिच्या प्रस्तुतीसाठी पुनाळ येथील आरोग्य सेवक हैबती मगदूम यांच्या सोबत जात असताना करंजफेण गावा- जवळच्या धावड्याचे शेताजवळ करंजफेनहून नांदगाव - कोतोली मार्गे कोल्हापूरला जाणारी एस. टी.समोरून आल्याने मोटरसायकल बाजून घेत असताना व रस्ता अरुंद असल्याने साईटपट्या खचल्याने पुढील चाक घसरले व तोल जाऊन हैबती मगदूम व स्वरुपा शिंदें खाली पडले त्याचवेळी एस. टी.गाडी पास होत होती. त्यादरम्यान शिंदे ह्या एस. टी. च्या मागील चाकाखाली सापडल्या व त्यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मूत्यू झाला.
दरम्यान जखमी झालेल्या हैबती मगदूम यांना मलकापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील सागर पाटील या एस. टी.चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वरूपा शिंदे यांच्या नविन घराची वास्तुशांती दोन महिन्यापूर्वी झाले होते, नव्या घरात राहण्यासाठी त्या कुटूंबासह राहत होत्या. शिंदें यांना इयत्ता ४ मध्ये शिकणारा मुलगा व अंगणवीडीत शिकणारी मुलगी असून त्यांचे पती विजय शिंदे प्राथमिक शिक्षक आहेत.गौरी गणपतीच्या सणात घडलेल्या अपघाताने नणुंद्रे गावावर शोककळा पसरली आहे.