घनशाम कुंभार
यड्राव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे शासकीय आरोग्य केंद्रांचे महत्त्व वाढले आहे. लसीकरणासोबत चांगले औषधोपचार मिळण्याची सोय येथे आहे. परंतु येथील आरोग्य उपकेंद्रातील तीन पदे रिक्त असल्याने एका आरोग्यसेवकावर गावातील सोळा हजार ग्रामस्थांच्या आरोग्याचा भार पडला आहे. तर लसीकरणासाठी इतर केंद्राच्या आरोग्यसेवकांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे येथील आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडल्याने त्याच्यावर रिक्त पदे भरून उपचार झाल्यास गावच्या आरोग्याची सुधारणा होणार आहे.
येथील आरोग्य केंद्रामध्ये एक आरोग्यसेविका, कंत्राटी आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, बाल आरोग्य अधिकारी व मदतनीस अशी पदे आहेत. याठिकाणी पंतप्रधान मातृत्व योजना, जननी सुरक्षा योजनेसह झीरो पोलिओ, बीसीजी, पेन्टा, गोवर, बूस्टर प्रतिबंधक लस व डोस देण्यात येतात.
सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असल्याने याठिकाणी ४५ वर्षांवरील ३६०० लसीकरणाचे लाभार्थी आहेत. परंतु १९६८ लोकांनाच दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. १४९९ लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर २१०० लोकांचे अद्याप लसीकरण व्हायचे आहे. नोंदणी केंद्राकडून जशी लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे येथील केंद्रामध्ये लस उपलब्ध होते.
परंतु जून महिन्यापासून आरोग्यसेविका, बाल आरोग्य अधिकारी ही पदे रिक्त असल्याने येथील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिरढोण व जांभळी उपकेंद्रांच्या आरोग्यसेविकांच्यावर अवलंबून आहे. येथील आरोग्यसेवकही आरोग्याने सक्षम नसल्याने त्यांना सेवा देण्यासाठी मर्यादा येतात. अशी वस्तुस्थिती असल्याने येथील प्राथमिक उपचार, जननी सुरक्षा योजने अंतर्गत सेवा देणे बंद झाले आहे. तर किरकोळ उपचारासाठी सात किलोमीटर अंतरावरील नांदणी केंद्राकडे धाव घ्यावी लागते.
--------------------
चौकट -
यड्राव आरोग्य केंद्रातील रिक्त पदे
येथील आरोग्यसेविका भाटे यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे. बाल आरोग्य अधिकारी बाबर यांची उदगाव कोविड सेंटरला बदली झाली आहे. तर कंत्राटी आरोग्यसेविका हे पद गेल्या दहा वर्षांपासून रिक्तच आहे.
फोटो - १५०६२०२१-जेएवाय-०२-यड्राव (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र