कोल्हापूर : फटाक्यांवर केला जाणारा अनावश्यक खर्च टाळून औषधी वनस्पतींचा समावेश असलेले सुगंधी उटणे आणि फुफ्फुसांच्या व्यायामासाठी उपयोगी असे फुगे वाटून निसर्गमित्रच्या तरुणांनी एक हजार कुटूंबाना दिवाळीची आरोग्यदायी भेट दिली आहे.फटाक्यांंच्या आवाजामुळे, आणि तयार होणाऱ्या धुरामुळे हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसांचे आजार, बहिरेपणा असे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गेली काही वर्षे निसर्गमित्र परिवारातील तरुणांकडून फटाकेमुक्त दिवाळी राबविण्यासोबतच कृतीशिल उपक्रम राबविला जात आहे.परिवारातील भारत चौगुले, यश चौगुले, शिवतेज पाटील, रोहित गायकवाड, शोएब शेख, रणजीत माळी या तरुणांनी फटाके दिवाळीचा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातून सुगंधी उटणे तयार केले तसेच व्यायामासाठी फुगे भेट देण्याचे ठरविले.या तरुणांनी महालक्ष्मी नगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहत, सरनाईक वसाहत, बेलबाग, रविवार पेठ या परिसरातील एक हजार कुटुंबांना हे सुगंधी उटण्याचे पाकीट आणि सोबत आबालवृद्धांसाठी फुगा भेट म्हणून दिला. या उपक्रमांमध्ये विलास डोर्ले, सुनिल चौगुले, राणिता चौगुले, अस्मिता चौगुले, अनुराधा चौगुले, कस्तुरी जाधव यांनी सहभाग घेतला.उटण्यामध्ये जडीबुटीचा समावेशसुमारे एक हजार कुटूंबामध्ये वाटण्यात आलेल्या उटण्यामध्ये कचोरा, नागरमोथा, वाळा, लोध्र, मंजिष्ठा, बावची, संत्रा साल, वेखंड, आंबेहळद, गुलाल, तगर, चंदन ओईल फ्लेवर या जडीबुटींचा समावेश आहे.
फुगा फुगवणे हा केवळ मनोरंजनाचा किंवा चेष्टेचा विषय नसून हृदयाचा व फुफ्फुसाच्या फिजियोथेरेपीमधील व्यायामाचा प्रकार आहे. दिवसातून दहा -बारा वेळा योग्य पद्धतीने फुगा फुगवल्यामुळे हृदयाचे आकुंचन व प्रसारण सुरळीत होते. दिवाळीत थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचा कोरडी पडते. अंगाला उटणे लावून आंघोळ केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.- अनिल चौगुले,कार्यवाह, निसर्गमित्र परिवार.