कोल्हापूर : महापौर अश्विनी रामाणे, नीलेश देसाई यांच्या जातपडताळणीबाबत विभागीय जातपडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात न्यायाधीश शंतनू केमकर व एम. एस. कर्णिक यांच्यासमोर सुरू असलेली सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली, तर संतोष गायकवाड यांच्या संदर्भातील सुनावणी अपूर्ण राहिली. त्यापुढील सुनावणी आता दि. ४ आॅगस्टला होणार आहे.महापौर रामाणे, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम यांच्यासह डॉ. संदीप नेजदार, दीपा दिलीप मगदूम (काँग्रेस), सचिन पाटील (राष्ट्रवादी), संतोष गायकवाड (भाजप), नीलेश देसाई (ताराराणी आघाडी) यांचे जातीचे दाखले विभागीय जातपडताळणी समितीने रद्द केले आहेत. त्याविरोधात सर्वांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायमूर्ती केमकर आणि कर्णिक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. गुरुवारी न्यायालयात महापौर रामाणे यांनी त्यांची वंशावळ व त्याचे पुरावे सादर करताना जुने सात-बारा उतारेही सादर केले. रामाणे यांच्यावतीने अॅड. अनिल अंतुरकर यांनी बाजू मांडली. जातपडताळणी समितीने केलेली कारवाई चुकीची आहे, असे अॅड. अंतुरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले; पण समितीने त्यांचा जातीचा दाखला रद्द करण्याची कारवाई योग्य असल्याचे असे सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी पुन्हा सांगितले, तर नीलेश देसाई यांच्या जातीच्या दाखल्याबाबत दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले. देसाई यांच्यावतीने अॅड. रामचंद्र मेंदाडकर-पाटील यांनी बाजू मांडली. दोघांच्या बाबतची सुनावणी पूर्ण झाली, तर संतोष गायकवाड यांच्यासंदर्भातील बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली; पण गायकवाड यांच्याबाबतची सुनावणी अपूर्ण राहिल्याने ती दि. ४ आॅगस्टला घेण्यात येणार आहे. यापुढील सुनावणी दि. ४ आॅगस्टला होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रत्येक नगरसेवकाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
अश्विनी रामाणे, देसाई यांच्याबाबत सुनावणी पूर्ण
By admin | Published: July 29, 2016 12:50 AM