कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सव काळात श्री अंबाबाई मंदिरात सुरू ठेवण्यात आलेल्या व्हीआयपी दर्शनाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर पहिली सुनावणी झाली. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्याने पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरला होणार आहे. श्री अंबाबाई मंदिरात दर्शनरांग सोडून अन्य कोणत्याही मार्गाने, कोणालाही दर्शन देऊ नये, असा आदेश १५ आॅक्टोबर २०१२ रोजी तिसरे दिवाणी न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी दिला होता. जिथून व्हीआयपी दर्शन दिले जाते, तिथेही न्यायालयाच्या या सूचनेचा फलकही लावण्यात आलेला आहे. तरीही यंदा नवरात्रौत्सवात देवस्थान समिती व पोलिसांतर्फे भाविकांना सर्रास व्हीआयपी दर्शन दिले जात असल्यामुळे, श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी, न्यायालयाचा अवमान होत असल्याप्रकरणी १९ आॅक्टोबरला याचिका दाखल केली. त्यानुसार देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना प्रतिवादी करण्यात आल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी मंगळवारी दिवाणी न्यायाधीश ए. ए. यादव यादव यांच्यासमोर झाली.कसबा बावडा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी मुदत मागितल्याने पुढील सुनावणी ७ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती गजानन मुनीश्वर यांनी दिली. (प्रतिनिधी)
अंबाबाईच्या दर्शनाबाबत सुनावणी ७ नोव्हेंबरला
By admin | Published: October 25, 2016 11:55 PM