कोल्हापूर : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके ग्रुपचे मालक डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.कोल्हापूर पोलिसांनी डीएसकेच्या कोल्हापुरातील टोप-संभापूर, सांगलीतील मालगांव व सोलापूर तर पुणे पोलिसांनी पुणेसह मुंबई येथील ५०० मालमत्ता सील केल्या आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत ३०० गुंतवणूकदारांचे जबाब घेतले असून फसवणुकीचा आकडा १९ कोटींपर्यंत गेला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी दिली. ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके ग्रुपवर पुणे, मुंबईत गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूर शहरासह, ग्रामीण भागातील शेतकरी, सेवानिवृत्त शिक्षक, व्यापारी व इतर व्यवसायांतील ६०० गुंतवणूकदारांनी एक लाखापासून ते १० कोटी अशा सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ‘डीएसके’मध्ये ठेवल्या असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत कोल्हापुरातील तीनशे गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल केले. या गुन्ह्यामध्ये ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार यांची मुख्य तक्रार आहे.
‘डीएसकें’च्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 6:25 AM