कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या प्रारूप याद्यांतील दुबार, मृतसह सभासदत्वासंबंधीच्या ठरावावरील उपनिबंधकांकडे सुरू असलेली सुनावणी प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या ७६ हरकतींवरील सुनावणीचा निकाल आता साेमवारी (दि. ८) जाहीर होणार आहे. यानंतर १२ला अंतिम मतदार यादी लावून एप्रिलच्या शेवटच्या किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया कशी होईल, याचे नियोजन सुरू होणार आहे.
‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवर ३५ दुबारच्या, तर इतर ४१ हरकती आल्या आहेत. दुबार ठरावावर मंगळवारी व बुधवारी सुनावणी पूर्ण झाली; पण निर्णय राखून ठेवण्यात आला. गुुरुवारीही ताराबाई पार्कातील दुग्ध कार्यालयात विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर, सहनिबंधक गजेंद्र देशमुख यांच्याकडे दुबार व मृत ठरावासह २३ हरकतींवर सुनावणी झाली. कागल तालुक्यातील कौलगे येथे ठरावधारकच मृत असल्याने त्यांच्याऐवजी एकाच संस्थेतून दोन ठराव आले होते. दोघांचेही म्हणणे ऐकून घेत सोमवार (दि. ८) पर्यंत निकाल राखून ठेवला.
पन्हाळा व गगनबावड्यातील ८ संस्थांना ‘गोकुळ’ने सभासदत्व नाकारले होते. यावर आलेल्या तक्रारीवर शिरापूरकर यांनी यापूर्वी सभासद करून घ्यावे असे आदेश दिले होते; पण यावर गोकुळ संघ न्यायालयात गेला. न्यायालयानेही सभासदत्व करून घेता येणार नाही, असा ‘गोकुळ’च्या बाजूनेच निकाल दिला. हा विषय गुरुवारी सुनावणीसाठी आला. शिरापूरकर यांनी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आपलाच यापूर्वीचा निकाल फेटाळून लावत रद्दबातल ठरवला.
विभागीय उपनिबंधकाकडे हरकतीवर वकिलामार्फत बाजू मांडताना ठरावधारक व त्यावर आक्षेप घेणारे यांची ठरावच कसा चुकीचा आहे, बैठक न घेता, नोटीस न पाठवता कसा परस्पर ठराव पाठवला आहे, ठराव बदला, अशी मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त होती.