कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र अर्जांवर दाखल झालेल्या ३१ अपिलांवर आज मंगळवारी दुपारी दोन वाजता प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्याकडे सुनावणी होत आहे. या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.‘राजाराम’ कारखान्याच्या निवडणुकीत दाखल अर्जांच्या छाननीत विरोधी आघाडीचे २९ उमेदवार अपात्र ठरवल्याची तक्रार आहे. यामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, डॉ. अशाेक पाटील, बाजीराव पाटील आदी दिग्गजांचा समावेश आहे. याविरोधात विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील अपात्र उमेदवारांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे अपील केली आहे.विरोधी आघाडीकडून ३० व इतर १ अशा ३१ अपील दाखल झाल्या आहेत. संबधितांना नोटिसा काढल्या असून, मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांच्या समोर सुनावणी होत आहे. विरोधी आघाडीने पात्रतेबाबतचे १ लाख ३० हजार कागदपत्रांचे पुरावे सहसंचालकांकडे सादर केले आहेत. आज, याबाबत आणखी युक्तीवाद होणार असल्याने या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ‘राजाराम’ कारखान्यासाठी २३ एप्रिलला मतदान होत आहे.१२ एप्रिललाच पॅनलची घोषणा
उमेदवार अपात्रता व दोन्ही आघाड्यांतील रस्सीखेच पाहता पॅनलची घोषणा लगेच करण्याची शक्यता धूसर आहे. अपात्रतेबाबत साखर सहसंचालक १० एप्रिलपर्यंत निर्णय देऊ शकतात. माघारीची मुदत १२ एप्रिल असल्याने त्याच दिवशी दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते.