- सतिश नांगरे
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसलेला नाही. आम्हीच कशी बाजी मारली, आपली ताकद कशी वाढली, याची गणितं राजकीय पक्षांचे नेते मांडत आहेत. काही गावांमध्ये अजूनही विजयाचं सेलिब्रेशन आणि पराभवाचं चिंतन सुरू आहे. त्याचवेळी, लोकशाहीची एक वेगळी बाजू, एक आगळं रूप कोल्हापूर जिल्ह्यातील शित्तूर वारुण गावात दिसलं.
पल्लवी मोहन महिंदकर या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या. २२ व्या वर्षी निवडणुकीच्या मैदानात उतरून विजयाची पताका फडकवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर अगदीच अनपेक्षित आणि आश्चर्याचा धक्का देणारं होतं. ‘दादा, मी वारणा नदीवर कपडे धुवायला आली आहे’, असं म्हणत त्यांनी हातचं काम थोडं बाजूला ठेवून आपल्या राजकारणातील प्रवेशाची गोष्ट सांगितली.
शित्तूर वारुण हे वारणा खोऱ्यातील डोंगरकपारीत असलेलं गाव. लोकसंख्या साधारण पाच हजार. चांदोली धरणाच्या पायथ्याशी वसलेलं. कुठलाही राजकीय वारसा नसताना या गावातूनच पल्लवी महिंदकर यांनी निवडणूक लढवली. किंबहुना, त्यांना ती लढवावी लागली.
‘दोन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. पती पदवीधर आहेत. पण, गावात नोकरी नसल्याने मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. कोरोना काळात त्यांची नोकरी गेली आणि ते गावी परत आले. तेव्हा, गावातील अनेक प्रश्नांबद्दल, अडचणींबद्दल त्यांच्यासोबत चर्चा व्हायची. गावातले प्रश्न सुटले पाहिजेत. विकास झाला पाहिजे, असं आपण नुसतं म्हणत राहतो. पण कोणीतरी येईल, बदल घडवेल, आपले प्रश्न सोडवेल, यावर माझा विश्वास नव्हता. त्यामुळे आपणच परिवर्तनाचे शिलेदार होवू या, या भावनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला,' असं पल्लवी यांनी सांगितलं. शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पल्लवी ४६१ मतं घेऊन विजयी झाल्या.पल्लवी यांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. जेमतेम शेती आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. फारसं राजकीय, आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही. तरुण मुली मोठ्या प्रमाणात राजकारणात आल्या, तर राजकारणाचा आजचा पोत बदलेल, असं पल्लवी यांना वाटतं. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करावी, या विचारानं पल्लवी यांनी राजकारणात उतरुन निवडणूक लढवली. त्या सांगतात, एका ग्रामपंचायत सदस्याकडून तशा ग्रामस्थांच्या अपेक्षा तरी किती असतात. नियमित पाणी, दैनंदिन स्वच्छता, गटारं, अंतर्गत प्रश्न मार्गी लागावेत हीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा असते. त्यामुळे या प्रश्नांवर मी भर देईनच. त्याशिवाय गावाच्या हिताच्या आड येणारं कोणतंही काम मी करणार नाही, असं पल्लवी यांनी ठामपणे सांगितलं.ग्रामपंचायत सदस्य म्हणून सर्वात आधी कोणतं काम कराल असं विचारलं असता, गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेत काही गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जावेत यासाठी प्रयत्न करेन, असं उत्तर पल्लवी यांनी दिलं. याशिवाय रोजगारासाठी गावातल्या तरुणांचं होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी, तरुणांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेती उत्पादनाला थेट बाजारपेठ, छोट्या मोठ्या व्यवसायांना बँका, फायनान्स कंपन्या, सहकारी संस्था व पतपेढ्या यांच्या मार्फत कर्ज मिळवून देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेन. गावात नोकरी मिळत नसल्यानं आजच्या घडीला प्रत्येक कुटुंबातील एक तरुण मुंबईला स्थलांतरित होत आहेत. त्यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पल्लवी यांनी सांगितलं.