कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने काल, सोमवार सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात धुवाँधार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तर, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंचगंगेची पाणीपातळी २५ फूट २" इंच इतकी असून एकुण १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे.काल, सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला. दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. शिरोळ वगळता सगळीकडे पाऊस चांगला झाला, त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रतिसेंकद १ हजार घनफूट विसर्ग सुरू आहे.शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीचा इशाराभारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात शुक्रवार (दि. ८) पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतलेशाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी गेलेले 70- 80 पर्यटक कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने काल, सोमवारी सायंकाळी अडकले होते. ते सर्व प्रवासी रात्री उशिराच सुरक्षितपणे माघारी परतले. अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.