कोल्हापुर : वीजेच्या गडगडाटासह झालेल्या परतीच्या पावसाने कोल्हापूर शहरासह परिसराला रविवारी पुन्हा एकदा झोडपले. या धुंवाधार पावसाने कोल्हापुरकरांची दाणादाण उडाली. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने, नवरात्री निमित्त मंदिरात आलेल्या भाविकांचे हाल झाले.
उपनगरातही ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. पर्यटकांचे झाले हाल झाले तर आठवडी बाजारात भाजी घेणाºया नागरिकांची दाणादाण उडाली.
या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीपाणी झाले. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांचे हाल झाले. नवरात्रौत्सव सुरु असल्याने अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही मंदीरात गुडघाभर पाणी आल्याने त्रेधा उडाली. तसेच लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारातही या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली.
दोन घरांत शिरले पाणी
शहरात झालेल्या मुसळधार पावसाने देवकर पाणंद येथील ओढ्याला पूर येऊन पाणी हर्षद ठाकूर यांच्या घरामध्ये शिरले; तर फिरंगाई तालीम, शिवाजी पेठ येथे शरद यादव यांच्या घरी ड्रेनेजचे पाणी शिरले. शनिवार पेठ, सोन्यामारुती चौकात जे. बी. पाटील यांच्या जुन्या धोकादायक घराची भिंत पडली.
तिन्ही घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान कृष्णात मिठारी, शैलेश कांबळे, सर्जेराव लोहार, खानू शिनगारे, उदय शिंदे, जयवंत डकरे यांनी धाव घेत घरात घुसलेले पाणी बाहेर काढण्यास मदत केली. या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.