धामोड (ता. राधानगरी) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज दिवसभरात तर पावसाने संपूर्ण परिसराला आक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत विक्रमी १६० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी ४ नंतर पावसाचा जोर वाढल्याने दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत तर तब्बल ८८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदवला गेलेला हा पहिलाच पाऊस आहे. या पावसाने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला असून, माळरानावरील खोळंबलेली रोपलागणीची कामे आटोपण्यात शेतकरीवर्ग गुंतला आहे. या मुसळधार पावसाने तुळशीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरणात ६० टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात २००० क्युसेक इतके पाणी आत येत असल्याचे शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांनी सांगितले.
फोटो ओळी= धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी धरणातील अद्ययावत पाणीसाठा.
छाया - श्रीकांत ऱ्हायकर