लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड तालुक्यांत अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. गेले दोन दिवस पाऊस सुरू असल्याने सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. ‘आर्द्रा’ नक्षत्र सुरू झाल्यापासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस सुरू आहे. पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, चंदगड तालुक्यांत दमदार पाऊस सुरू असून, रविवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली. सकाळपासूनच जोरदार सरी कोसळत राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. दुपारी काही वेळ पावसाने विश्रांती घेतली; पण पुन्हा दुपारनंतर भुरभुर सुरू झाली. पावसाने सुरुवात केल्याने शेतीच्या कामांची धांदल उडाली आहे. भात, नागलीच्या रोपलावणीसाठी शिवारे फुलली आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६२ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. रविवारी दिवसभर पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. कोल्हापूर शहरात सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू होती. दुपारी दोन वेळा जोरदार सरी कोसळल्या. तालुकानिहाय पाऊस मि.मी.मध्ये हातकणंगले- २.२५, शिरोळ- ०.४२, पन्हाळा- ३०.४२, शाहूवाडी - २६.१७, राधानगरी - ३४.५०, गगनबावडा- ६१.५०, करवीर- १०, कागल- ११.२०, गडहिंग्लज- ५.५७, भुदरगड- ३१, आजरा- १३.५०, चंदगड- २८.१६.
जिल्ह्यात दमदार पाऊस
By admin | Published: June 26, 2017 12:53 AM