गगनबावडा : गगनबावडा परिसरात सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे.गगनबावडा परिसरास दुपारपर्यंत वातावरण ढगाळ होते. मात्र, चार वाजल्यापासून पावसाने कोसळण्यास सुरुवात केली. गेले दोन दिवस गगनबावड्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर नव्हता. काल, मात्र ढगफुटीसदृश पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. गटारे, वहाळाचे पाणी काही ठिकाणी पात्राबाहेर आले. पावसाच्या जोरामुळे रानात चरायला सोडलेली गुरेही घरी परतली. या पावसाचा जोर सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होता. मुसळधार पावसाने सुमारे तीन तासांहून अधिक काळ झोडपून काढले. त्यामुळे हवेत प्रचंड गारठा निर्माण झाला होता.
भुईबावडा घाटात दरड कोसळलीजोरदार पावसामुळे भुईभावडा घाटात वैभववाडी तालुक्याच्या हद्दीत दरड कोसळून हा रस्ता बंद झाला. गगनबावडा येथील काही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.