कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यात धुवाधार पाऊस असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. ‘राधानगरी’तून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी १८ फुटाच्या वर गेली असून ९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस होत आहे. अधूनमधून का असेना पण जोरदार सरी कोसळत आहेत. विशेष म्हणजे रात्री पाऊस जोर धरतो. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड, चंदगड तालुक्यात त्याला अधिक जोर आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी पाऊस कमी असला तरी या पाच तालुक्यात जोर जास्त आहे. ‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘पाटगाव’, ‘घटप्रभा’, ‘जंगमहट्टी’, ‘जांबरे’, ‘सर्फनाला’ ‘कोदे’ या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस पाटगाव धरण क्षेत्रात तब्बल १३२ मिलीमीटर झाला.धरण क्षेत्रात पाऊस असल्याने राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्याची फुग ‘कुंभी’, ‘कासारी’, ‘तुळशी’ नदीला आहे. पंचगंगेची पातळी वाढली असून १८ फुटाच्या वर गेली आहे. सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पडझडीत ६५ हजाराचे नुकसानजिल्ह्यात दोन खासगी मालमत्तांची पडझड होऊन ६५ हजारांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत पडझडीमध्ये ६ लाख ३० हजारांचे नुकसान झाले आहे.राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग जिल्ह्यातील राधानगरी धरणात २.६५ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, कासारी नदीवरील- यवलूज, वारणा नदीवरील- चिंचोली व माणगांव असे ९ बंधारे पाण्याखाली आहेत.धरणांमध्ये पाणीसाठा पुढीलप्रमाणे राधानगरी २.६५ टीएमसी, तुळशी १.३५ टीएमसी, वारणा १२.१९ टीएमसी, दूधगंगा ४.७३ टीएमसी, कासारी ०.९५ टीएमसी, कडवी १.२९ टीएमसी, कुंभी ०.९२ टीएमसी, पाटगाव १.६७ टीएमसी, चिकोत्रा ०.५१ टीएमसी, चित्री ०.५९ टीएमसी, जंगमहट्टी ०.५१ टीएमसी, घटप्रभा १.५५ टीएमसी, जांबरे ०.५९ टीएमसी, आंबेआहोळ ०.८९ टीएमसी, सर्फनाला ०.०६ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.१० टीएमसी इतका पाणीसाठा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी राजाराम १९.३ फूट, सुर्वे २०.४ फूट, रुई ४६.३ फूट, इचलकरंजी ४४.९ फूट, तेरवाड ४१.६ फूट, शिरोळ ३१.६ फूट, नृसिंहवाडी २५ फूट, राजापूर १४.९ फूट तर नजीकच्या सांगली ८.३ फूट व अंकली ८.१० फूट अशी आहे.