कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पंधरा ते वीस मिनिटे जोरदार सरी कोसळल्या, मात्र सगळीकडे पाणीच पाणी केले. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला.
राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या खरीप पिकांना पावसाची गरज आहे. गेली चार-पाच दिवस अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे. मात्र, पाऊस वळिवासारखा पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप पिकांना अजून महिनाभर पावसाची गरज आहे. आतापासूनच पाऊस पडेल तिथेच पडेल, असा सुरू झाला तर पिके धोक्यात येऊ शकतात.
रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, मात्र दहा नंतर आकाश स्वच्छ झाले. दुपारी अडीचनंतर कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली. पंधरा ते वीस मिनिटे जोरदार पाऊस कोसळल्याने सगळीकडे पाणीच पाणी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली असतानाच अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
आज, सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी ढगाळनंतर आकाश स्वच्छ होऊन दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तापमानातही घट झाली असून कमाल तापमान २५ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १९ मिली मीटर पावसाची नोंद झाली.