कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १६१.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून कडवी, कासारी, कोदे या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस कोदे धरणक्षेत्रात ११४ मिलिमीटर झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे.राधानगरी धरणाचे मंगळवारी दुपारी क्रमांक ३ व ६ हे स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, सांडव्यासह एकूण विसर्ग प्रतिसेकंद ३,६२८ घनफूट सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. तुळशीतून ७५६, वारणातून १५७१, दूधगंगेतून ५२५ घनफूट असा विसर्ग सुरू आहे.पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ झाली असून, तब्बल बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.गणेशोत्सवाच्या धामधुमीतच जोरदार पाऊस कोसळत असल्याने तरुण मंडळांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात घरगुती गणेश विसर्जनाच्या अगोदर दोन दिवस सजीव देखावे सादर केले जातात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पावसामुळे मंडळांची गोची झाली आहे.शेतीला पोषक पाऊस
भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची परिपक्वतेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या काळात पिकांना पाण्याची गरज असते. त्यामुळे हा पाऊस खरीप पिकांना पोषक असून, मध्यंतरी दोन आठवडे दिलेली उघडीप व त्यानंतर सुरू झालेल्या दमदार पावसाने ऊसपिकांची जोमात वाढ होण्यास मदत होणार आहे.सरासरीच्या निम्मा पाऊसजिल्ह्यात पडणाºया पावसाची वार्षिक सरासरी १७७२.३९ मिलिमीटर आहे. आतापर्यंत सरासरी ९०७.६० (५१.२१ टक्के) मिलिमीटर पाऊस झाला असून, आॅगस्ट महिन्याच्या सरासरीच्या केवळ २७ टक्के पाऊस झाला आहे.
धरणातील पाण्याचा विसर्गप्रतिसेकंद घनफूटमध्ये असा-राधानगरी- ३,६२८तुळशी - ७५६वारणा - १५७१दूधगंगा - ५२५कासारी - १३५२कडवी - १८६कुंभी - १२५०घटप्रभा - १६२५