ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, पंचगंगेच्या पातळीत वाढकोदे, कासारी धरणक्षेत्रात अतिवृष्टी
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड तालुक्यांत दिवसभर दमदार पाऊस राहिला. कोदे, कासारी धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून, आगामी दोन दिवस पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून, पंचगंगाही प्रवाहित झाली आहे.
पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा वाढत चालला असून, सोमवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. ग्रामीण भागात पहाटेपासूनच रिपरिप सुरू राहिली. सकाळी दहानंतर त्यात वाढ होत गेली. दिवसभरात थोडी उसंत घेतली की नंतर एकसारखा पाऊस सुरू होता. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून कोदे, कासारी क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे.नद्यांच्या पातळीतही वाढ होत असून, पंचगंगा बऱ्याच दिवसांनी प्रवाहित झाली आहे. रविवारी पंचगंगेची पातळी दहा फूट होती, तर सोमवारी सायंकाळी सहा वाजता पातळीत पाऊण फुटाने वाढ झाली. कोल्हापूर शहरातही सकाळपेक्षा दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. एकापाठोपाठ एक सरी कोसळत राहिल्याने वातावरणात गारठा जाणवत होता. शहरातील सखल रस्त्यांवर पाणी तुंबले, तर गटारी भरून वाहू लागल्या.दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १४.१५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात ४३.८३ मिलिमीटर झाला. गगनबावडा, भुदरगड, आजरा, शाहूवाडी तालुक्यांत पावसाचा जोर राहिला आहे.जिरवणीचा पाऊस पोषकमान्सूनने सुरुवात केल्यापासून खरीप पिकांना हवा तसा पाऊस पडत आहे. ‘रोहिणी’ व ‘मृग’ नक्षत्र काळात पडलेल्या पावसाने खरिपाची उगवण झाली. ‘मृगा’ने शेवटच्या टप्प्यात विश्रांती घेतल्याने मशागतीची कामे झाली. आता ‘आर्द्रा’ नक्षत्राने चांगली सुरुवात केल्याने पिके जोमात आहेत. एकदम धुवाधार पाऊस झाला की नुकसान होते; पण असा जिरवणीचा पाऊस झाल्याने पिकांबरोबर जमिनीलाही पोषक ठरतो.
धरण क्षेत्रातील पाऊस कंसात मिलिमीटरमध्ये -राधानगरी (४७), तुळशी (२०), वारणा (२६), दूधगंगा (३७), कासारी (२५), कडवी (३७), कुंभी (४१), चिकोत्रा (०३), चित्री (३४), घटप्रभा (२८), कोदे (१०४).