कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी पावसाची भुरभुर कायम राहिली. सकाळी अनेक तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. दरम्यान, धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर शहरात मात्र उघडझाप असून, दुपारनंतर काही काळ कडकडीत ऊन पडले.शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, भुदरगड तालुक्यांत दिवसभर पावसाची भुरभुर राहिली. तुलनेने शिरोळ, हातकणंगले, करवीर, गडहिंग्लज तालुक्यांत पाऊस कमी झाला. शनिवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७.२८ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून, सरासरी ३५ मिली मीटर पाऊस आहे. ‘कुंभी’ व ‘चिकोत्रा’ वगळता सर्वच धरणे भरली असून, त्यातून विसर्ग सुरू आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १६००, ‘वारणा’मधून ४३७३, दुधगंगेतून २०००, तर घटप्रभामधून १६२५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची फुग कायम आहे.
जिल्ह्यातील दहा बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर शहरात शनिवारी उघडझापच राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या; पण काही वेळाने कडकडीत ऊनही पडले होते.