कोल्हापूर : कोल्हापूरकरांची बुधवारची पहाट वळवाच्या पावसानेच सुरू झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि हवेत काहीसा गारवा जाणवत होता. यामुळे बळीराजाची लगबग वाढली असून, खरीप पेरणीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मंगळवारी रात्री कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी पहाटेपासूनही पावसाची रिपरिप सुरूच होती. सकाळी आठपर्यंत पाऊस राहिला, मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण राहिले. ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवत होता.
दुपारी तीननंतर आकाशातील ढग पांगू लागले आणि सूर्यनारायणाने दर्शन दिले. बुधवारी जिल्ह्यातील तापमान ३७ डिग्री राहिले. आगामी चार दिवसांत त्यात फारशी वाढ होणार नसली तरी ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर काही ठिकाणी वळवाचा पाऊस होईल, असेही म्हटले आहे.