कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला. कोल्हापूर शहरात मात्र ढगाळ वातावरणासह पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावली.मान्सूनचे आगमन येत्या दोन दिवसांत कोकणात होईल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्याप्रमाणे वातावरण तयार होत असून सकाळपासूनच ढगाळ हवामान राहिले. सकाळी नऊपर्यंत आकाशात ढगांनी दाटी केली होती.त्यानंतर सूर्यप्रकाश राहिला पण उष्मा वाढत गेला. दुपारनंतर आकाश पुन्हा काळवंडून आले आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. कोल्हापूर शहरात मात्र आकाश गच्च झाले, सायंकाळी साडेचारनंतर आकाश पुन्हा स्वच्छ होऊन ऊन पडले.
तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा-हातकणंगले-२.६३, शिरोळ-निरंक, पन्हाळा-६.२८, शाहूवाडी-२.१७, राधानगरी-६.००, गगनबावडा-१०.५०, करवीर-१३.२६, कागल-१५.७१, गडहिंग्लज-३.२८, भुदरगड-३.४०, आजरा-९.५०, चंदगड-१.८३.
२८ घरांची पडझडमंगळवारी सकाळी आठपर्यंत करवीर व कागल तालुक्यातील २८ घरांची पडझड झाली. हालसवडे येथील तीन घरांची पडझड होऊन ८० हजार तर कसबा सांगाव येथील २५ घरांची पडझड होऊन साडेसात लाखांचे नुकसान झाले. त्याचबरोबर हंदेवाडी (ता. आजरा) येथील सदाशिव फडके यांचा बैल विजेच्या खांबावर पडल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू होऊन ४० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.