कोल्हापूर : सासूच्या पावसाने ढगाकडे बघायला लावल्यानंतर सोमवारपासून आलेल्या सुनांनी भुरभुर का असेना, पण सुरुवात केल्याने पिकांना जीवदान मिळाले असून शिवारही आनंदले आहे. ही तुरळक हजेरी मंगळवारी आणि बुधवारी देखील कायम राहिली. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी पावसाची अगदीच भुरभुर होती. पावसाचा खरा जोर मंगळवारपासूनच वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यात महापूर ओसरल्यापासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस किरकोळ स्वरूपात हजेरी लावत आहे. कडक उन्हामुळे माना टाकणाऱ्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळत असलेतरी त्यांच्या वाढीवर मात्र परिणाम झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रविवारपासून पाऊस जोर धरेल, असा अंदाज हवामान खात्याचा होता, पण पुन्हा जोरदार पावसाने हुलकावणी दिली आहे. मंगळवारपासून मात्र जिथे ढग उतरतील तेथे पाऊस पडत असल्याने कुठे आनंदाचे तर कुठे प्रतीक्षेचे चित्र आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्हाभर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ऊन पडले. संध्याकाळी भुरभुर सुरू झाली आणि पुन्हा उघडीप घेतली.
दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या सुधारीत अंदाजानुसार मंगळवार ते शुक्रवार असे सलग चार दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस पडणार आहे. यानंतर पुन्हा एक दिवसाच्या विश्रांतीनंतर दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.