साळवण : गगनबावडा तालुक्याला सलग दोन दिवस पाऊस व वाऱ्याने झोडपून काढले आहे. गगनबावडा तालुक्यात गुरुवारी २२ जुलै रोजी गगनबावडा क्षेत्रात २६५ मि.मी. तर साळवण क्षेत्रात २८३ मि.मि. एकूण ५४८ मि.मि. पावसाची नोंद झाली. आज सरासरी २७४ मि.मि. पावसाची नोंद झाली. पावसाळ्यात आजअखेर एकूण २५०२ मि.मि. पावसाची नोंद झाली
सतंतधार पडणाऱ्या पावसामुळे कुंभी नदीचे पाणी नदीपात्रातून बाहेर पडल्यामुळे खोकुर्ले, शेणवडे, मांडुकली, मार्गेवाडी, साळवण, वेतवडे, किरवे ठिकाणच्या रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. कुंभी धरणातून ४२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला असून अणदूर, कोदे आणि वेसरफ तलावांमधूनही पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे कुंभी, सरस्वती, धामणी व रूपणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे.
रेव्याची वाडी, पळसंबे, अणदूर, मांडुकली, वेतवडे या गावचे बंधारे पाण्याखाली गेली आहेत. शेणवडे व मांडुकली दरम्यान पाणी आल्यामुळे काही प्रवासी अडकले असून, त्यांची स्थानिक ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्ता कालपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. गगनबावडा तहसीलदार, पोलीस ठाणे व पाटबंधारे विभागाकडून घरीच राहण्याचे व सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
२२ गगनबावडा मांडुकली रोड
फोटो : मांडुकली रस्त्यावर आलेले पुराचे पाणी.