एम.एम.गुरव शित्तुर वारुण : धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने चांदोली धरणातून आज, गुरुवारी (दि. २७) सकाळी पुन्हा विसर्ग वाढवला. विद्युत निर्मिती प्रकल्पातुन १६३० क्युसेक व वक्राकार दरवाज्यातून ५१५० क्युसेक विसर्ग असा एकूण ६७८० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.चांदोली धरणाची ३४.४० टी.एम.सी क्षमता आहे. धरणात आज अखेर एकूण पाणीसाठा २८.९३ टी एम सी (८४..१०%)पाणीपातळी ८१९.३०४. द.ल.घ.मी इतकी झाली असून आज अखेर १०५५ मीमी पावसाची नोंद झाली. धरणात १४४३ क्युसेक इतकी आवक होत आहे.कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली आहे. तेथील वाहतूक बंद आहे. मांगले-सावर्डे बंधारा खुला झाला आहे. सागावची स्मशानभूमी पाण्याखाली आहे. चांदोली धरण, पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, धनगरवाडा येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कांडवन येथील लघु पाटबंधारे प्रकल्प भरला असून, अतिवृष्टीमुळे प्रकल्प क्षेत्रात पर्यटकांना बंदी घातली आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर; धरणातून ६७८० क्युसेकने विसर्ग सुरू, पूरस्थितीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:52 AM