कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांची दैना उडवून दिली आहे. तरणा-म्हाताऱ्या पावसासारखा झडीचा पाऊस सुरू आहे. या पावसाला गारठा असल्याने दिवसभर अंगातील हुडहुडी जात नाही.
या पावसाचा शेती कामावर परिणाम झाला असून सध्या खरीप पिकांच्या खुरपणीचे काम सुरू आहे; पण शिवारात पाणी राहिल्याने खुरपणीचे काम करता येत नाही. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २८.९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. शाहूवाडी, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. धरणक्षेत्रात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.राधानगरी धरणाचा ३ व ६ व्या क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून प्रतिसेकंद ४ हजार ४५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे; त्यामुळे भोगावती नदीची पातळी झपाट्याने वाढत आहे. ‘वारणा’ धरणातून ६०८८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ‘कुंभी’, ‘कडवी’, ‘कासारी’सह इतर नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता २६.७ फूट होती, सायंकाळपर्यंत त्यात फुटाची वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील १४ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहिशी विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसाने जिल्ह्यात १८ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून यामध्ये ३ लाख ४८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -हातकणंगले (९.३७), शिरोळ (८.७१), पन्हाळा (२३.५७), शाहूवाडी (३६.८३), राधानगरी (३९.३३), गगनबावडा (७०), करवीर (१८.२७), कागल (२७), गडहिंग्लज (१५.८५), भुदरगड (३४.८०), आजरा (२७.५०), चंदगड (३५.६६).