राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत गेल्या आठ-दहा दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामध्ये साखर उद्योगाला अधिक फटका बसला असून सहा दिवसांत केवळ 7 लाख ५६ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्यांची दिवसाची गाळप क्षमता पाहता किमान ६ लाख ९६ हजार टनाने गाळप घटल्याचे निदर्शनास आले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तमिळनाडू, आंध्रप्रदेशसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठा तडाका बसला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सलग आठ दिवस पाऊस राहिल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना बसला आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी परतीच्या पावसाने १ नोव्हेंबरपासूनच हंगामाला गती आली होती. हंगाम गती पकडत असतानाच अवकाळी पावसाने पुन्हा काहीसा ‘ब्रेक’ लावला. गेली आठ-दहा दिवस रोज पावसाची हजेरी असल्याने कारखान्यांचा गळीत हंगाम थंडावला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २३ कारखान्यांची प्रतिदिनी १ लाख २६ हजार टन तर सांगली जिल्ह्यातील १८ कारखान्यांची ८२ हजार ७५० टन गाळप क्षमता आहे. १५ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात १९ लाख १९ हजार टन तर सांगलीमध्ये ९ लाख ४ हजार टन असे २८ लाख २४ हजार टन गाळप झाले होते. त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने हंगामाची गती मंदावली, शिवारात पाणी उभा राहिल्याने ऊसतोड करता येत नाही. परिणामी गेल्या सहा दिवसांत कोल्हापुरातील कारखान्यांचे २ लाख ४७ हजार टन तर सांगलीतील कारखान्याचे ३ लाख ९ हजार टन गाळप झाले आहे. कारखान्यांची गाळप क्षमता पाहता दोन्ही जिल्ह्यांत जवळपास ६ लाख ९६ हजार टनाने गाळप कमी झाले आहे.
कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांनाही फटका
सुरुवातीच्या टप्यात आडसाल लागणीची तोडणी सुरू आहे. त्यामुळे ओलीवर तोडणी झाली तर खोडव्याची उगवण होत नाही. त्याचबरोबर सततच्या पाण्याने उसाचे वजन कायम राहिले, मात्र, साखर उताऱ्याला झटका बसला आहे. कोल्हापूर व सांगलीचा सरासरी उतारा ९.७ टक्यापर्यंत खाली आला आहे.
तुलनात्मक उसाचे गाळप टनात -
कोल्हापूर - १९ लाख १९ हजार, २१ लाख ६६ हजार
सांगली - ९ लाख ४ हजार, १२ लाख १३ हजार