लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण : चांदोली धरणक्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, चांदोली धरणाचे दोन दरवाजे गुरुवारी दुपारी तीन वाजता उघडण्यात आले आहेत. धरणाच्या सांडव्यातून ४८८३ क्युसेक, तर पायथा गेटमधून ११२५ क्युसेक असे एकूण ६००८ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा वारणा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने झोडपून काढले असून, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत तब्बल १८५ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणात २४ हजार ४४१ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या ३२ तासांत धरणाची पाणीपातळी तब्बल साडेचार मीटरने वाढली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तर सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत ७५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आजअखेर १०९३ मि.मी. पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. ३४. ४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाची पाणीपातळी सध्या ६२२.१५ मीटरवर पोहोचली आहे. धरणात सध्या ८३८.३२० द.ल.घ.मी म्हणजेच २९.६१ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ८६.०५ टक्के भरले आहे.
चौकट -
धरणातील पाण्याचा विसर्ग व मुसळधार पावसामुळे परिसरातील रेठरे-कोकरूड हा बंधारा तर जांबुर-विरळे, मालेवाडी-सोंडोली, सोंडोली-चरण व शित्तूर-आरळा हे पूल पाण्याखाली गेले आहेत. परिणामी नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे.
२२ चांदोली धरण
फोटोः
चांदोली धरणाचे दोन दरवाजे उघडून आजपासून पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. (छाया : सतीश नांगरे)