कोल्हापूर : वीजेच्या कडकट्यासह शनिवारी दुपारी कोल्हापूर शहराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सुमारे वीस मिनिटे एक सारखा पाऊस राहिल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.
गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. वळीवा सारखा पडेल त्या ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अजिबातही पडत नाही. गुरूवारी संपुर्ण जिल्ह्यात धुवॉँदार पाऊस झाला होता, सगळीकडे पाणीच पाणी करून सोडल्याने पाण्यासाठी रस्ताही अपुरा पडत होता.
शुक्रवारी दिवसभर काही ठिकाणचा अपवाद वगळता पाऊस झाला नाही. शनिवारी सकाळ पासून खडखडीत ऊन राहिले. ऊनाचा पारा इतका होता की सकाळी नऊ वाजता अंग भाजून निघत होते. दुपारी बारा नंतर ऊनाची तीव्रता वाढत गेली आणि त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश दाटून आले.
साधारणता दुपारी सव्वा दोनच्या सुमारास शहरात पावसास सुरूवात झाली. वीजेचा कडकडाट आणि जोरदार कोसळणाºया पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली. सुमारे वीस मिनिटे कोसळलेल्या पावसाने रस्त्यावर पाणी उभा केल्याने वाहतूक संथ गतीने सुरू राहिली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. रस्त्यांना अक्षरशा तळ्याचे स्वरूप आले होते. त्यानंतर हवेत कमालीचा गारवा पसरला.
खरीप पिकांना पोषक पाऊस
सध्या भातासह इतर खरीप पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज असून वळीव स्वरूपात का असेना पण जोरदार कोसळणारा पाऊस पोषक आहे.
कागलने सरासरी ओलांडली
गत वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. तरीही कागल तालुक्याने सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यातच आपली सरासरी ओलांडली आहे. कागल मध्ये सरासरी ६४९.६० मिली मीटर पाऊस पडतो, यंदा ६६५.११ मिली मीटर झाला आहे. त्या पाठोपाठा शाहूवाडी तालुक्यात ९५ टक्के पाऊस झाला असून सर्वात कमी हातकणंगले तालुक्यात केवळ ३४ टक्के पाऊस झाला आहे.