श्रीकांत ऱ्हायकरधामोड: राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. खामकरवाडी -अवचितवाडी दरम्यान आसलेला खामकरवडी लघूपाठबंधारे प्रकल्प काल, रविवारी मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या सांडव्यातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तर धरणाच्या सांडव्यावरून पडणाऱ्या विहंगम पाण्याचे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी धरणस्थळावर नागरीकांची मोठी गर्दी होत आहे.गेल्या आठवडाभरा पासून जिल्हयात पावसाची रिपरिप वाढली आहे. त्यामुळे तलाव व छोटया -मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पावसाने दमदार एंट्री केल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून रोप लागणीच्या कामाला वेग आला आहे.खामकरवाडी प्रकल्प खामकरवाडी व अवचितवाडी या दोन गावासाठी वरदान आहे. प्रकल्प या वर्षी लवकरच कोरडा पडल्याने शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला होता. पण गेली आठवडाभर पावसाची संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला प्रकल्प मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पात११६२.७८ सहस्त्र घनमीटर इतका पाणीसाठा होतो. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.
Kolhapur: राधानगरीत पावसाचा जोर कायम, खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हर फ्लो'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 6:59 PM