लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप राहिली. सकाळी काही तालुक्यांत पावसाची भुरभुर सुरू असली तरी दुपारनंतर कोल्हापूर शहरात ऊन पडले होते. धरणक्षेत्रात मात्र पाऊस कायम असून, पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २८.१ फुटांपर्यंत पोहोचली असून अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.
शुक्रवार सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कोल्हापूर शहरात दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. दुपारनंतर पूर्णपणे उघडीप राहिली. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यात मात्र पावसाची भुरभुर कायम राहिली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ९० मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. कागल, गडहिंग्लजमध्ये तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिले.
धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेंकद १३००, वारणा धरणातून ११०० तर, घटप्रभा धरणातून ४७६५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाऊस कमी असला तरी नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २८.१ फुटांपर्यंत पोहचली असून १८ बंधारे पाण्याखाली आहेत.
पडझडीत ९० हजारांचे नुकसान
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत दोन खासगी मालमत्तांची पडझड होऊन सुमारे ९० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा -
राधानगरी (३.७०), तुळशी ( १.८३), वारणा (२२.९४), दूधगंगा (११.०४), कासारी (१.६३), कडवी (१.२९), कुंभी (१.७४).